फार दिवसापासून उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बाहेर फिरायला जायचे नक्की केले होते. 20 एप्रिल 2018 हा दिवस नक्की केला. पुट्टापर्थी, तिरुपती आणि तिरुमला असा प्रवासाचा बेत आखला. 1 महिन्यापूर्वीच रेल्वे रिझर्व्हेशन, रुम बुकींग ऑनलाईनच करुन ठेवले. जायचे दिवस जसजसे जवळ आले तसतसे उत्सुकता वाढचतच होती. आणि एकदाचा 20 एप्रिल आला. आमचे रेल्वे पुट्टापर्थी येथे जाण्यासाठी 8 वा. 25 मि. येण्याचे वेळ होते पण ट्रेन 1 तास लेट होती. आम्ही 8 वाजताच स्टेशनवर हजर. पण ट्रेन आपण जेव्हा गावी जातो नेमके तेव्हाच कसे लेट असते कळत नाही. एकदाचे ट्रेन 9.30 वा. आली. सकाळी वेळेवर धर्मावरम स्टेशनवर पोहोचली. धर्मावरम स्टेशन फार स्वच्छ आणि सुंदर आहे. स्टेशनच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटींग केलेल्या आहेत. आम्ही तेथून पुट्टापर्थी येथे बसने निघालो. पुट्टापर्थी (प्रशांती निलयम) म्हंटले की, सत्य साईबाबा यांचे स्मरण होते. किंबहुना पुट्टपर्थी हे सत्यसाईबाबांमुळेच देश-विदेशात प्रसिध्द आहे. बाबांच्या बाबतीत अनेक गुढ कथा, रहस्ये आणि वादग्रस्त घटना प्रचलित आहेत. माझ्या मनातही त्यांच्या बाबतीत अनेक शंका-कुशंका होत्याच. मुळातच मी बुवा-बाबा विश्वास न ठेवणारा. बाबांच्या भक्तांच्या यादीत मी ज्यांना माझे आदर्श मानतो अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यात सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सुरेश वाडकर. बाबांच्या सत्य साई प्रतिष्ठान अनेक सामाजिक कार्य करीत असतात. जसे मोफत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जिथे देश-विदेशातील विख्यात डॉक्टर येऊन आपली सेवा देतात. येथील हॉस्पिटलमध्ये अनेक दुर्धर रोगांवर मोफत उपचार दिले जाते. रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व विख्यात डॉक्टरांकडून उपचार केले जाते. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत राहण्याची व जेवणाचीही सोय केली जाते. त्यामुळे गोर-गरिबांना दुर्धर आजारांवर उपचार करुन घेणे शक्य होत नाही अशा लोकांना यामुळे अत्यंत मोलाची मदत होते. पुट्टापर्थी व आजुबाजूच्या खेड्यांमध्ये पाण्याची दुर्गमता होती व लोकांचे हाल-हाल होत होते. सत्यसाई सेंट्रल ट्रस्ट ने आंध्र प्रदेश सरकारच्या मदतीने 1994 मध्ये सुमारे 400 कोटी रुपये खर्च करुन पुट्टापर्थी व आजबाजूच्या 700 खेड्यांना पाणी पुरवण्याचे प्रकल्प पूर्ण केले. सत्यसाई इनस्टिट्युट द्वारे प्राथमिक पासून ते पीएचडी पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. सत्यसाई इनस्टिट्युट ऑफ हायर लर्निंग ही डिम्ड युनिर्व्हसिटी असून ती भारतील ए+ युनिर्व्हसिटी आहे. येथे विद्यार्थ्यांना संस्कृती बरोबरच उच्च तंत्रज्ञानाने शिक्षण दिले जाते. अशा अनेक पैलूंवर विविधांगांनी विचार केल्यावर माझ्या मनात सत्यसाई बाबांबद्दल आदर निर्माण झाला. चित्रावती नदीच्या परिसरात पुट्टापर्थी हे गाव वसले आहे. त्याला प्रशांती निलयम असे म्हंटले जाते. आमची बस चित्रावती नदीच्या परिसरातून पुट्टापर्थीत पोहोचत होते. सुरुवातीलाच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिसू लागले थोड्या वेळातच आम्ही गावात प्रवेश केला. सुंदर अशा प्रवेशद्वारातून आम्ही प्रशांती निलयमला पोहोचलो. माझी मोठी बहिण येथेच स्थायिक झाली आहे. मुळातच तिला भेटावयास आम्ही पुट्टपर्थीचा बेत आखला. तिच्याच घरी आम्ही मुक्कमास होतो. येथे पाहण्यासारखे काय काय आहे याची माहिती आम्ही तिच्याकडून घेतले व एक एक स्थळ पाहण्यास सुरुवात केले.
कुलवंत हॉल व सत्यसाई समाधी
प्रशांती निलयम परिसरात सत्यसाई बाबा आश्रम आहे. या आश्रमात विविध मंदिरे आहेत. तसेच सुमारे 4 हजार लोक एकत्र बसू शकतील असा कुलवंत हॉल भव्य बसून या हॉलची सजावट अत्यंत सुंदर व कलात्मक आहे. या हॉलमध्ये स्त्री व पुरुषासाठी वेगवेगळे विभाग केले आहे. विद्यार्थी, भाविक या हॉलमध्ये एकत्र जमतात व अत्यंत सुरेख आवाजात व संगीताच्या तालात भजन गातात त्यामुळे येथे नेहमी प्रसन्न व भक्तीपूर्ण वातावरण असते. या हॉलच्या एका बाजूस सत्यसाईंची शुभ्र अशी संगमरवरीची समाधी आहे. या समाधीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भक्त येते येतात. भक्त सर्वांना ओम साईराम अशीच हाक देतात. हा कुलवंत व समाधी बघण्यासारखी आहे.
सनातन संस्मरण संग्रहालय (ओल्ड म्युझियम )
आश्रमाच्या दक्षिण बाजूच्या टेकडीवर सनातन संस्मरण संग्रहालय आहे. हा म्युझियम अनंत वारसा संग्रहालय म्हणूनसुध्दा ओळखला जातो.मनुष्याच्या उत्क्रांतीमध्ये अध्यात्माच्या अनुभवाची भर पडते. जगाच्या प्रमुख धर्माच्या संत आणि ऋषी यांचे चिरंतन संदेश समजावून सांगण्यासाठी आकर्षक कलाकृतीने हा म्युझियम सजलेला आहे. या म्युझियममध्ये सत्यसाईबाबांचे वडिल पेद्दावेंकम्मा राजू रत्नाकरम व आई ईश्वरम्मा यांच्या सुबक पूर्णाकृती मूर्त्या आहेत. तसेच यजुर्वेद, सामवेद, अर्थववेद व ऋग्वेदाच्या प्रती प्रदर्शित केल्या आहेत. हिंदू मंदिरे, मक्का व मदिना मश्जिद, चर्च, गुरुद्वारा, बायबल, कुराण इत्यादी सर्व धर्माच्या प्रतिकृती प्रदर्शित केल्या आहेत. अत्यंत कलात्मक रितीने सजावट केलेला हा म्युझियम खरोखर पाहण्यासारखा आहे. म्युझियमच्या परिसरात मोठी गर्द झाडी आहेत. टेकडीवरुन प्रशांती निलयम व चित्रावती नदीचे विहंगम दृश्य मनास आनंद देते.
चैतन्य ज्योती म्युझियम
श्री सत्यसाईबाबांच्या आगमनाची 75 व्या वर्षाची आठवण म्हणून सत्यसाई बाबांच्या जीवनावरील मल्टिमीडिया प्रेझेंटेशन आणि आकर्षक प्रदर्शनासह बाबांच्या जन्माच्या आणि बालपणाच्या कथा त्या घटनेशी संबंधीत भविष्यवाण्या आणि अवतरणातील प्रमुख टप्पे प्रदर्शित केले आहेत.. डोंगराळ उंचीवर बांधलेले हे ईमारत भिन्न वास्तूशास्त्राच्या शैलीचे आणि प्राचीन व आधुनिक संयोगाचे एक स्मारक आहे. या म्युझियमचे छप्पर जपानी पध्दतीची आहे. म्युझियमच्या द्वारात पाण्याचा कृत्रिम दबदबा तयार केला आहे. पाण्याच्या टाकीत विविध रंगांची मासे पाहण्यासारखी आहेत.
चित्रावती
आम्ही मोठ्या उत्सुकतेने नदी पाहण्यास व त्यात डुंबण्यास चित्रावती तीरी निघालो. तेथे पोहोचून पाहतो तर काय ? नदी कोरडी. पात्रात सर्वत्र कचरा विखुरलेला. मन विशःण्ण झाले. बहुतेक पावसाळ्यात येथे यावे लागेल.
इतर स्थळे
वेळे अभावी आम्ही वरील स्थळेच पाहिली. पण येथे इतर काही दर्शनीय स्थळे आहेत 1) कल्पवृक्ष 2) प्लॅनेटेरियम 3) मेडिटेशन ट्री 4) अजेनय्यास्वामी मंदिर 5) गोकुलम 6) गोपूरम 7) सत्यभामा मंदिर
एकंदर पुट्टपर्थी हा पाहण्यासारखा आहे. पण उन्हाळ्यात येथे जाऊ नये. हिवाळ्यात गेल्यास उत्तम.



Comments
Post a Comment